अजंठा चित्रे: एक नाट्यमय रसास्वाद



१. महासमाज जातक, बुद्धांकडून परास्त झालेला खजील मार राजा परत जाताना, अजंठा गुहा क्र. १६


अजंठा! एक जादुई अनुभव, एक मानवी चमत्कार! आपल्याला ज्ञात असलेल्या काळाप्रमाणे २०० वर्षांपासून अजंठा येथील चित्रं-शिल्पं सर्व जगाला विस्मित करत आले आहेत आणि पुढील कितीतरी वर्ष करत राहतील. सुमारे अठराशे ते सोळाशे वर्षांपूर्वी जेव्हा ही वास्तु घडवली गेली, तेव्हा देखील ह्या कला सृजनाने बहुतेक तेव्हाच्या प्रेक्षकांना इतकाच विस्मयकारक अनुभव दिला असणार ह्यात शंका नाही.

अजंठाच्या गुहा सापडल्या पासून त्यांतील चित्रं, रंग इतका मोठा कालखंड ही कलाकृती कशी टिकून राहिली, ह्यावर भरपूर अभ्यास चर्चा करण्यात आलेली आहे. त्याच बरोबर ह्या गुहा कोरण्याचा, शिल्प चित्र निर्मितीचा नेमका कालखंड, वर्ष कोणते हा देखील विद्वानांचा अगदी ध्यासाचा विषय ठरला आहे. ह्याच मुळे ह्यात वापरलेले रंग कोणते, रंगलेपन पद्धती कशी काय, कुंचला कोणता वापरण्यात आला, भित्ती पट कसा तयार करण्यात आला इत्यादी बाबींवर बारकाव्याने लक्ष्य देण्यात आले. पण अजंठा येथील चित्रं हि केवळ 'तांत्रिक चमत्कार' एवढेच मर्यादित आहे का?

ही चित्रं केवळ एवढी वर्ष टिकून राहिली एवढेच त्यांचे महत्व असावे हा केवळ उपहास आहे, ही चित्रं आजही बघणाऱ्याला मोहित करतात. त्या चित्रांचे विषय समजले नाहीत तरी त्यातील व्यक्ती - प्राण्यांच्या हालचाली, रचना, आकर्षक भासतात आणि त्या चित्रांकडे पहात रहावे असे वाटते; ही सर्व जिवंत वाटतात, आपल्यासमोर कथा घडत आहेत असं जाणवतं, कारण ह्या चित्रांमध्ये 'नाट्य' आहे!

ही नाट्यमयता भावनाविभोर आहे, आणि मानवी मन असे पर्यंत अजंठा मोहित करत राहणार, हेच तर कारण नसेल की जवळ-जवळ २९ गुहांमध्ये (आज केवळ गुहा क्र. , , १६ १७) झपाटल्यासारखी ही चित्रं कोणा एका रसिकाने रंगविण्यास सांगितले आणि कुणा तेवढ्याच पिसाट कलाकारांनी ती साकारली?  आज अनेक वर्षानंतर चित्रांच्या तांत्रिकतेच्या पलीकडे जाऊन त्या कलाकार रसिकांच्या दृष्टीने अजंठा काय असावे हा विचार करणे जास्त संयुक्तिक वाटते.  अजरामर कलाकृती अनुभवायला केवळ बुद्धी नव्हे तर मन आणि अनुभूती समप्रमाणात एकरूप होणे अवश्यक असते. भारतीय कला सौंदर्यशास्त्रात ह्यास रसास्वाद वा अलौकिक अनुभव असे म्हणतात. पण बुद्धांच्या जीवन पटात वा जातक कथांमध्ये प्रत्यक्षात हा अनुभव होता का? का कुणा उत्तम कथाकाराने तो कथानकात बांधला असावा, म्हणून त्या चित्रांच्या आविष्कारात ती कथा सुरस रंगते?
अजंठाची ही भित्तिचित्रे नक्की कोणत्या कलाकारांनी रंगविली आहेत हे आजही आपल्याला निश्चित माहित नाही. राजाश्रयाखाली कलाकारांचे चमू असत वा बौद्ध भिक्खू असत, या दोहोंना येथे रंगविलेल्या कथा कुठूनतरी कळात होत्या, आणि त्याही अतिशय सुरस रित्या. अजंठाची सुरुवात साधारण इसवी सन दुसऱ्या शतकात झाल्याचा नक्की अनुमान लावला गेला आहे, आणि पुढे साधारण दोनशे ते चारशे वर्ष ह्या गुहा निर्माण होत होत्या. भारतीय राजकीय इतिहास बघता हा काळ म्हणजे कुशाण राज्याच्या लगेच नंतर येणारा. कुशाणांचा मूळ पुरुष कनिष्क (सा. ईसवी सन १२५ -२८), ज्याने मौर्य साम्राज्यावर वर्चस्व मिळवून पेशावर ते पाटलीपुत्र असे बलाढ्य राज्य स्थापित केले; अर्ध्याहून अधिक उत्तरेकडील भारत, आजचे पाकिस्तान, बलुचिस्तान, अफगाणिस्तान अशी ह्याची पोच. 

कनिष्क अतिशय कलासक्त, त्याने त्याची राजधानी पुरुषपूर (आजचे पेशावर) येथे टेराकोटा व पाषाणात अनेक कलाकृती निर्माण करून घेतल्या ह्याच काळात भारतीय कला इतिहासातील सौन्दर्यपूर्ण व महत्वाची गांधार शैली विकसित झाली; अशोकानंतरचा हा बौद्ध विचारांचा मोठा भोक्ता. कनिष्कचा काळ बौद्ध व धम्म विचारांच्या दृष्टीकोनातून अतिशय महत्वपूर्ण ठरतो, ह्याच्याच काळात काश्मीर येथे भव्य ‘सांगिती’ झाल्याची नोंद आहे, जिच्यात बौद्ध विचारांमध्ये क्रांती घडवणारे दोन निर्णय घेण्यात आले:

·         एक म्हणजे गांधार आणि मथुरा येथील वास्तू -शिल्पांमध्ये बुद्धाची प्रतिमा नाकारण्याची परंपरा भंग केली आणि बुद्धाची सुबक शिल्पं टेराकोटा व पाषाणात निर्माण होऊ लागली

·         दुसरे म्हणजे बौद्धांचे नाट्य व नाट्यकाव्याविषयीचा उपरोध आता दूर झाला आणि अनेक नवीन नाट्यकाव्य धम्म विचार, बुद्ध कहाण्या व जातक कथा सांगण्यास लिहिली व सादर केली जाऊ लागली.[1] 

ह्या अनुषंगाने अग्रगण्य होता तो भारतातील पहिला काव्य नाटककार, कालिदासाच्या आधी लोककीर्ती प्राप्त केलेला अश्वघोष! कुशाण काळात जेव्हा बौद्ध प्रतिमा निर्माण करण्याचा निर्णय झाला, तेव्हा गौतम बुद्धांना महापरिनिर्वाण होऊन किमान पाचशे ते सहाशे वर्ष झाली होती, त्यांना बघितलेले कुणीही जीवित असण्याची शक्यता नगण्य. अशा वेळी त्यांच्या जीवन संघर्षाबद्दल, शिकवणींबद्दल व तत्वज्ञानाबद्दल सर्वांना सांगण्याचे कार्य कलेने केले. त्यात अश्वघोषाने लिहिलेले बुद्धचरित हे अग्रगण्य!

अश्वघोष नेमका कोण ह्याबद्दल पुरेशी माहिती आपल्याकडे नाही. १९११ मध्ये तुर्फान, रशिया येथे पामच्या पानांवर लिहिलेले तीन हस्तलिखितांचे अवशेष सापडले, हे होते अतिशय महत्वाची अशी तीन भव्य बौद्ध नाटकं. ह्या नाटकांचा लेखक निर्माता सुवर्णाक्षी चा पुत्र अश्वघोष, असा उल्लेख आहे, ज्यावरून त्याची ओळख सापडते. हा मूळ साकेत वा अयोध्येचा ब्राह्मण, वेद-उपनिषद-रामायण-महाभारत ह्यांचा अभ्यासक. पारंपरिक कथेनुसार अश्वघोषाला वादविवादात हरवणे अशक्य, त्याच्या समोर मोठे विद्वान वादळात झाडे कोलमडून पडल्या प्रमाणे पडत. पण एकदा थोर बौद्ध विद्वान महास्थवीर पार्श्व ह्यांनी त्याला परिचर्चेत मूक केले आणि तो बौद्ध भिक्खु म्हणून पुढे जगला. ह्या विचारांनी त्याला इतके प्रभावित केले कीअश्वघोष पुढे जाऊन महायानाचा विचारवंत झाला आणि 'महायान श्रद्धोत्पाद शास्त्र' ह्याचे लिखाण केले.[2]

अश्वघोषाचे नाव कनिष्क राजाशी अविरत जोडलेले आहे, म्हणून या आधी कनिष्काची प्रस्तावना! दंतकथा सांगते की कनिष्काने परास्त केल्यावर पाटलीपुत्राच्या राजाला नुकसानभरपाई देणे असंभव ठरत होते, म्हणून त्याने बुद्धाचे भिक्षा पात्र, एक उकृष्ठ स्वैपाकी आणि नाट्यकाव्यकार-तत्वज्ञ अश्वघोष त्याला दिले. पुढे अर्थातच कनिष्काच्या महायान बौद्ध विचारांचा अश्वघोष मोठा प्रबोधक झालेला आढळतो. दुसऱ्या कथेनुसार उधं येथील चौथ्या बौद्ध सांगीति करिता अश्वघोषाला निमंत्रित केले गेले. वसुमित्राच्या अध्यक्षतेखाली अश्वघोष उपाध्यक्ष होता व अनेक बौद्ध लिखितांवर व्यवस्था बघून नियमबद्ध मांडणीचे काम त्याने केले असे सांगितले जाते. या कथांमधील खरे-खोटे सांगणे कठीण, पण एवढे मात्र खरे की अश्वघोष व कनिष्क राजाने त्यांच्या  काळातील कलेत आमूलाग्र बदल घडवून आणला. 

आता ह्या सर्वाचा अजंठाशी संबंध काय?

फा-हैन नावाचा एक चिनी विचारवंत व अभ्यासक पाचव्या शतकाच्या सुरवातीला भारतात फिरत आला आणि पुढील दहा वर्ष आपल्या देशात विहार केला. त्या काळातील भारतातील जीवनपद्धतीबद्दल त्याचा लिखाणातून आपल्याला इत्थ्यंभूत माहिती मिळते. हा फा-हैन अजंठाला जाऊन तेथील हत्तींच्या शिल्पाला घाबरून परत फिरल्याचा उल्लेख आहे.

फा-हैन त्याच्या प्रवासवर्णनात लिहितो,
"अनेक अभिनेत्यांना बोलावून नाटक सादर केले गेले, ज्यात सारीपुत्र, जो मूलतः एक ब्राह्मण होता तो बुद्धांकडे समन्वय साधण्यास गेला. मौद्गल्ययान आणि कश्यपाच्या जीवनातील घटना ही अशाच नाट्यरूपाने सादर केल्या जातात.”[3]

हे नाटक म्हणजे अश्वघोषाचे 'शारीपुत्रप्रकरण'. अश्वघोषाचा कालखंड कनिष्काबरोबर म्हणजे साधारण ई. स. दुसरे शतक, आणि फा-हैन भारतात असण्याचा कालखंड ई.स. ४०१-४१०; यावरून लक्षात येते की  अश्वघोषाची नाट्यकाव्य त्याच्या नंतर किमान दोनशे ते तीनशे वर्ष बौद्ध मठ-विहारांमध्ये, गावो-गावी सादर केली जात होती. हा कालखंड म्हणजे गांधार शैलीचा मध्य भारतापर्यंत प्रसार व अजंठा लेण्यांना समांतर आहे. अजंठा चित्रांमधील नाट्यमयता आणि 'रस' यांचा स्रोत हि सादर होणारी सुरस नाटकं असण्याची शक्यता नाकारता येणार नाही, किंबहुना नाट्यशास्त्रात सूचित केलेले अनेक संदर्भ ह्या चित्रांमध्ये आढळतात. अश्वघोष ह्या नाटककाराची नाट्यकाव्य नाट्यशास्त्रामध्ये नमूद केलेल्या शास्त्रीय पद्धतीच्या बऱ्याच जवळ जाणारी  आहेत. अश्वघोषाला मुख्य तीन नाटकांसाठी जमा धरले जाते, बुद्धचरित, सौंदरानंद आणि सारिपुत्रप्रकरण.  पद्यात नाट्य लिहिणारा अश्वघोष (सा. ई. स. १५०-) पहिला भारतीय नाटककार मानला जातो, भास (सा. ई. स. ३५० – ४००) आणि कालिदासाच्या (सा. ई. स. ५०० – ५६५) अनेक शतकं अगोदर लोकोत्तर प्रसिद्ध असलेला हा नाटककार नक्कीच त्या काळातील दृक कलांना प्रभावित करत असणार. अश्वघोषाने त्याच्या  नाटकांमध्ये बुद्ध विचारांना केवळ मांडले नाहीयेत तर त्यांना मानवी मूर्त स्वरूप देऊन ते समजण्यास सोपे व रंजक केल्याचे आढळते. सारीपुत्रप्रकरण हे नऊ अंकी भले मोठे नाटक नाट्यशास्त्राच्या बरेच जवळ जाते, ह्यात मौद्गलयान आणि सारीपुत्र यांचे बुद्धांद्वारे विचार परिवर्तन आणि पुढे बौद्ध धर्मात पदार्पण सुरस मांडले आहे.[4] या व्यतिरिक्त एका नाटकामध्ये बुद्धी, कीर्ती आणि द्रुती यांना मानवी रूप देऊन त्यांच्यातील संवाद दाखवलाय. अशा स्वरूपातील सादरीकरण नक्कीच सर्वांना आकर्षित करत असणार. कदाचित ह्याच कारणाने अजंठातील चित्रं केवळ विषय मांडत नाहीत तर ते कथा सादर करतात, ह्या चित्रांवर नाट्याचा नाट्याचा  प्रभाव अबाधित आहे असे वाटते. 


२. डोंगराच्या निसर्गरम्य पार्श्वभूमीवर पद्मपाणी बोधिसत्त्व, अजंठा गुहा क्र. १
(नाट्यशात्रात आहार्य अभिनयातील दुसऱ्या भागात दर्शविलेले सर्व अलंकार परिधान केलेले दिसतात)


भारतातील हा काळ कलेकरीता 'सुवर्णकाळ'! नाट्याची परंपरा अश्वघोषापासून या चौथ्या शतकापर्यंत वृद्धिंगतच होताना दिसते; हा काळ तर महाकवी कालिदासाचा! तेव्हा ह्या काळातील कलाकार सौंदर्याबाधा होण्यापासून वंचित ते कसे राहणार! पतंजलीने म्हंटल्याप्रमाणे, "नटस्य शृणोति, ग्रंथिकस्य शृणोति", ग्रांथिक व विद्वान हे एकच सांगत असताना नटाचे का ऐकावे? तर विद्वानापेक्षा नट जेव्हा अभिनय करून सांगतो तेव्हा तो उपदेश वाटत नाही आणि स्वाभाविक ज्ञानप्राप्ती हि घडून येते.[5] ह्यावरून नाट्याचे भारतातील सांस्कृतिक स्थान लक्षात येते, अर्थात ह्यात लक्षात घेतले पाहिजे की ही नाट्य हे सर्वसामान्य जनांकरिता म्हणून निर्माण झालेली कला असे प्रस्थापित आहे. 

अजंठातील चित्रांवर नाट्याचा प्रभाव आणि त्यातील बरीच सूत्र जाणवतात, जसे अभिनयाचे प्रकार, व्यासपीठ उभारणी व मुख्यत्वे रसास्वाद. नाट्यशास्त्रात अभिनयाचे चार प्रकार सांगितले आहेत: सात्विक, आंगिक, आहार्य व वाचिक. ह्यातील 'आहार्य' म्हणजे वेष परिधान करणे, दशरूप धारण करणे, देखावे इत्यादी. आहार्य अभिनयात परत चार प्रकार केले जातात: पुस्त, अलंकार, अंगरचना आणि सज्जीव.[6] व्यक्तिरेखा उभी करताना पोशाख, अंगाचा वर्ण, अनेकविविध केशरचना विस्ताराने ह्यात मांडलेल्या आढळतात. अजंठा चित्रात हे सर्व आपणास आपसुक बघावयास मिळते, शरीराचे अनेक वर्ण, बहुरंगी नक्षी छाप असलेले पोशाख आणि शेकडोने केशरचना. ही चित्रं त्या काळातील लोकजीवन दर्शवतात हे मानले तरी एवढ्या प्रमाणातील विविधता आणि सौंदर्य निर्मिती नाट्यप्रभावित असण्याची शक्यता अधिक. आहार्य अभिनयाचा दुसरा प्रकार म्हणजे अलंकार, पुरुष व स्त्रियांकरिता नावासकट व कोठे घालायचे ह्या तपशीलांसकट नाट्यशास्त्रात आढळतात.  सर्वात प्रकर्षाने जाणवतो तो ह्या चित्रांमधील भावनाअविष्कार, अर्थात 'रस'. प्रत्येक जातक कथा, व बुद्धांच्या जीवनातील घटना की केवळ सांगितली नसून त्यात कथानक आहे, विभाव व अनुभाव आहे, व्यभिचारी व विरोधी भाव ही आहे; आणि त्यामुळेच ह्या चित्रांमधून लोभस आणि अलौकिक भासणारा रस निर्माण होतो.
उदाहरण म्हणून विदुर पंडित कथेतील हा भाग:

३. विदुर जातक, नाग राजा त्याचा राणीची इच्छा पूर्ण करण्याकरिता आपल्या मुलीस विदुर पंडितांचे हृदय आणण्यास सांगतोय, अजंठा गुहा क्र.२

सर्व पात्रांनी सुंदर रंगलेपन केलेले आहेच पण त्याचबरोबर सुशोभित आभूषणे घातलेली दिसतात. शिवाय नाग राजा आणि राणी दर्शवण्याकरिता दोहोंच्या डोक्यामागे पाच तोंडाचा नागाचा मुकुटही आहे, आजही नाटकात अशाच प्रकारच्या रंगभूमीवरील साहित्याची जमवाजमव केलेली आढळते. हा सर्व आहार्य अभिनयच तर आहे! या कथेत राणीला विदुराचे हृदय मिळवून देण्याकरिता राजकन्या कुबेराच्या दरबारातील यक्षाशी विवाह करण्याचे योजते, व शेवटी विदुराला आपल्या राज्यात घेऊन येते. विदुराला राणीचा हट्ट समजतो आणि त्याचा लक्षात येते की राणीला त्याचा शहाणपणा व बुद्धी हवी आहे, त्या प्रमाणे तो तिला सर्व ज्ञान देतो.[7] या कहाणीचा सादरीकरणाप्रमाणे नाट्यमय देखावा गुहा क्र. २ मध्ये  बघायला मिळतो. 

४. विदुर जातक, यक्ष विदुराला आणण्यासाठी कुबेराची परवानगी घेताना, अजंठा गुहा क्र.२



५. विदुर जातक, विदुर पंडित नाग राजा व राणीला आपले ज्ञान सांगताना, अजंठा गुहा क्र.२


या कथानकात उत्कंठा, ईर्षा, चातुर्य, भीती आणि शांत असे अनेक भाव उत्पन्न होतात, हे भाव चित्रांत रंगविलेल्या पात्रांमध्येही दिसतात. 

नाट्यशास्त्राच्या 'रस' यावर आधारित अजंठातील आणिक एक उदाहरण, छदन्त जातक. ह्यात बघायला मिळते शृंगार रसाच्या बाबतीत नाट्यशास्त्रात सांगितलेली दशरूपता. नाट्यशास्त्रानुसार परस्परांबद्दल प्रेम उत्पन्न झाले असता आयोगात जी स्थिती तयार होते त्याचा दहा अवस्था असू शकतात, अभिलाष होणे, सतत नाव घेतल्याने चिंतन होणे, परस्परांची आठवण येऊन स्मृती, त्याच्याविषयी सतत बोलणे हे गुणकिर्तन, उत्कंठा वाढून होणारा उद्वेग, त्यामुळे विकृत विलाप, त्याने वेड्यासारखे होऊन उन्माद, त्याची व्याधी, व्याधीतून येणारी निश्चेष्टता आणि ती जडता सरतेशेवटी मरण.[8] ह्या अवस्था मिळून निर्माण होते ती दशरूपता आणि नाट्यकार याच रचनेतून शृंगार रस रसिकांमध्ये उत्पन्न करतो. छदन्त जातकात आपल्याला ही रचना पाहण्यास मिळते. छदन्त हा सहा सोंडांचा हत्ती विध्य पर्वतांमध्ये आपल्या दोन राण्यांसह रहात असे, एकदा एक सुंदर परी त्याचा पायाशी कमळ टाकते आणि तो ते त्याचा दुसऱ्या राणीस देतो. यावर पहिली राणी ईर्षेने पेटून तिची दशरूपता हीअवस्था रचनकाराने मांडली आहे. ही सुंदर रचना गुहा क्र. १७ मधील चित्रात आपणास बघायला मिळते. त्यात कथानकाप्रमाणे छदन्त हळू हळू पुढे येतो, जसा पडद्यावर असावा आणि डाव्या बाजूला सर्व मानवी पात्र राजवाड्यात अभिनयात दिसतात.


६. छदन्त जातक, अजंठा गुहा क्र. १७

नाट्यशास्त्रातील असे अनेक पैलू या चित्रांमध्ये उलगडतात, इथे केवळ काहीच उदाहरण म्हणून नमूद केले आहेत.

ह्या लेखात कोठेही कलाकारांचे सामर्थ्य वा निर्मितीकौशल्यावर गालबोट लावण्याचा हेतू नाही, केवळ भारतीय सौंदर्यशास्त्राच्या अनुषंगाने सर्व कला सार्वभौम होत्या आणि संस्कृती सौंदर्याधिन होती हे समजणे एवढाच आहे. शिवाय अजंठा येथील चित्रांचा मानव निर्मित चमत्काराच्या पुढे जाऊन एक कलाविष्कार म्हणून बघायचा आणि त्यातील अनुभूती प्रकर्षाने अनुभवण्याचा हा एक छोटासा प्रयन्त. या नंतर अजंठाला गेल्यावर क्षणभर त्या कलासक्त नाट्याचा अनुभव घेऊन बघा, म्हणजे भारतीय चित्रशैली आजतागायत तशीच अविश्रांत आपल्यात मुरली आहे हे जाणवेल आणि हजारो वर्षांचे हे अंतर क्षणार्धात विलीन होईल.  

(सर्व चित्रं माझे गुरु व अजंठा ला वाहून घेतलेले अभ्यासक श्री. राजेश सिंघ यांच्या अजंठा पेंटिंग्स ह्या पुस्तकातून घेतलेली आहेत)


[1] Varadpande Manohar Laxman, History of Indian Theatre: Classical Theatre, Abhinav Publications, 1987
[2] Varadpande Manohar Laxman, History of Indian Theatre: Classical Theatre, Abhinav Publications, 1987
[3] Quoted by Dr. Kunjunni Raja in his monograph Kuttiyattam from Chinese Literature, Part 3 referred from Varadpande Manohar Laxman, History of Indian Theatre: Classical Theatre, Abhinav Publications, 1987
[4] Edited by Farley P. Richmond, Darius Swann, Philip Zarilli, Indian Theatre: Traditions of Performance, Motilal Banaras Publication, 1993
[5] केतकर गोदावरी, भारतमुनींचे नाट्यशास्त्र, पॉप्युलर प्रकाशन, १९६३
[6] केतकर गोदावरी, भारतमुनींचे नाट्यशास्त्र, पॉप्युलर प्रकाशन, १९६३
[7] Singh Rajesh, Ajantha Paintings, Harisena Press Pvt. Limited, 2013
[8] Singh Rajesh, Ajantha Paintings, Harisena Press Pvt. Limited, 2013

Comments

Popular Posts